त्याने घड्याळात पाहिले तेव्हा भारतीय वेळेनुसार रात्रीचा १ वाजत आला होता. म्हणजे आता पाच दहा मिनिटेच. तेवढ्यात अनाउन्समेंटही झाली. वाकून खिडकीतून पाहिल्यावर अंधारातली मुंबईची लक्ष दिव्यांची आरास त्याच्या मनात शिरू पाहत होती. एक सुखद जाणीव. मायदेशात परत आल्याची. जमिनीवर पहिले पाऊल टाकताना तो मनाशीच हसला. हे अखेरचंच, आता संपलं. इमिग्रेशन, बॅगेज क्लिअरन्स ह्याने अधिकाधिक वैतागत जात तो बाहेर येत गेला. मुंबईचा नवा दिमाखदार एअरपोर्ट भारतातून बाहेर जाताना अधिक देखणा दिसतो का? येताना बाहेर यायची घाई अधिक.
बाहेर गर्दी आणि चिकचिकाट ह्यामुळे तो जागेवर आला. थोडं थांबणंच चांगलं.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून टॅक्सी सुसाट सुटली होती. ट्राफिक फार नव्हता. गार वारा चेहऱ्यावर घेत तो ओळखीच्या खुणा निरखीत स्वस्थ बसला होता. शिवाजी पार्कवरून जाताना त्याच्या मनात आलं, श्रीधर इथेच कुठेसा राहत होता. आता बहुतेक अंधेरीला शिफ्ट झालाय. सुजाताचा तर पत्ताच नाहीये.
वरळी सी फेस नजीक ग्रीन पार्क हॉटेल जवळ त्याने टॅक्सी थांबवली. सामान उचलायला बेलबॉईज धावले. बुकिंग तर होतंच.
शांतपणे विचार करत तो बाल्कनीतल्या आरामखुर्चीत विसावला होता. उद्यापासून बरीच कामं करायचीत. बरंच फिरायचंय. एखादा महिना असाच जाणारसा दिसतो.
मुख्य म्हणजे घर. कसं करायचं हे? पुन्हा पुन्हा मोडायचं, घडवायचं. पण इलाज नाही. हे अखेरचं का? माहीत नाही. कदाचित नाहीच. सगळी विखुरलेली मुळं हुडकून आणायला हवीत. कुठली हाक कुठे घेऊन जाते....
आणि माधवी? तिचं काय?
पुणं.
आठवण येताच एखाद्या कड्यावरून दरीकडे पाहावं तसं त्याचं मन आक्रसून गेलं. तो विचार आता नकोच. इमर्सन मधली अपॉइंटमेंट परवाच्या दिवशी आहे. उद्या अजय-मीरा ला भेटावे. त्याला झोप लागून गेली.
तुझ्या नानाची टांग, साल्या !
अरे, जरा ऐक....
गप्प बैस. एक शब्द बोलू नकोस. काही लाज वाटते की नाही? आम्ही इथे असताना हॉटेलात उतरलास? आणि तिकडून निघताना एक फोन केला असतास तर काय दिवाळं निघालं असतं का तुझं? एनी वे. हिच्याशी बोल. मी जरा ऑफिसच्या गडबडीत आहे.
हॅलो....
मीरा....कशी आहेस तू?
मी तर चांगलीच आहे रे. पण तुला काहीतरी झालेलं दिसतंय.
झाली का तुझीही सुरुवात? बये, तुझ्या नवऱ्याने केली ती बडबड पुरेशी झाली नाही का?
बरं ठीकाय. मला एवढंच सांगायचंय, की अजून एक तासाने सामान बांधून तयार रहा. मी येतेय गाडी घेऊन. तुझं ते हॉटेल सीफेस ला आहे ना?
हो, पण मी काय म्हणतो...
काही म्हणू नकोस. सी यु सून.
रूमचा दरवाजा उघडताच मीरा ला पाहून तो एकदम स्तब्ध झाला. तिला निरखीत तो हसायचा प्रयत्न करत होता. तिच्या डोळ्यांत वर्षानुवर्षे पावसाचा मारा सहन करणाऱ्या झाडाप्रमाणे, तरीही एक तेज लेवून, असं कारुण्य. एक कथाच. इन अ समराईझ्ड फॉर्म. शेवटी तो हसलाच. तिच्याकडेही त्याच्यासाठी एक स्मित होतं.
केवढी बदललीस असं म्हण ना!
बदल तर सर्वांना हवाच असतो. पण काही गोष्टी अगदी निश्चितच अढळ, शाश्वत असतात हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं.
दॅट प्रूव्हज युअर पॉईंट ! तू अगदी तसाच आहेस तर!
मीरा, तुझी तब्येत मात्र खराब दिसतेय.
खूप धावपळ झाली रे एवढ्यात. शिवाय आजारीही होते.
काही सिरीयस?
छे! आता अगदी नॉर्मल आहे.
तुझी लेक कशी आहे? मला ओळखणार नाही आता.
हं. बरीच वर्षं झाली ना. ती आता १० वर्षांची आहे.
अजय काय म्हणतोय?
तो बिझी नेहमीप्रमाणे. मुंबईत असला तर भाग्यच आमचं. बरं ते जाऊ दे. तुझा प्रोग्रॅम काय आहे?
ते सगळं बोलूच की सावकाश. आता बरेच दिवस तुझ्याचकडे ठाण मांडून बसणार आहे.
कायमचा माझ्याकडेच राहा. ओके?
बरं मला एक सांग. आठवलं म्हणून. तू अश्विनीला ओळखतेस?
अश्विनी कामत?
हं...
हो ओळखते की. चांगलीच. गेल्या आठवड्यातच भेटली होती. बिचारी....तुला कळलं असेल ना?
हो. आमची मैत्री आहे तशी. 'नेट'की ! पण बिचारी वगैरे म्हणायची गरज नाही. चॉइसेस असतात हे.
एकाचा चॉइस, दुसऱ्याचं प्राक्तन असंच ना?
अगदी असंच नाही. बरं राहू दे. आज-उद्या तिला भेटेन म्हणतो. सुहासलाही भेटायचं आहे.
चल. घरी गेल्यावर खाऊन वगैरे घे. थोडी विश्रांती घ्यायची तर घे. मग जा भटकायला.
मीरे, तुझा प्लॅन कॅन्सल करायला नको होतास तू.
नक्की? तुला हवं होतं मी यायला?
शंका आहे का?
हो आहेच. मला खरं तर यावंसं वाटत होतं तुझ्या कठीण प्रसंगात सोबत म्हणून. पण कॅन्सल केलं त्याला इतर कारणं ही आहेत. जाऊ दे.
अजय-मीराचं घर फार सुंदर होतं. पैशाने लगडलेलं वाटावं मुंबईच्या बाहेरच्या वातावरणात. श्रीमंतीही स्वागत करणारी असते किंवा नसते. इथे राहावं का? मीराला नक्की हवंय. अजयला सुद्धा बहुधा. पण अर्थात सकाळी बोलला ते अगदी दोस्तीत असलं तरी २-३ दिवसांपेक्षा जास्त राहिलेलं त्याला फार आवडेल असं नाही. हाऊ आर यू विचारल्यावर फाईन म्हणायचं असतं. तसंच, बोलावलं, आलो. पण निघावं लवकर. घराचं काम कुठवर आलं हे सुहासला विचारायला हवं आजच.
अश्विनीचा एवढा विचार का येतोय मनात? काही लॉजिक नाहीये. इतके दिवस चॅटवर बोलता बोलता आता हेच कळेनासं झालं की मी ह्यात का आहे. सुख दु:ख निवडून घेणाऱ्या वर्गातले आपण. त्यामुळे हेही ठीकच. पंचेचाळीशी उलटली. अजून असं स्त्रीमध्ये इन्व्हॉल्व्ह होता येतं आपल्याला? येतंच की. इन्व्हॉल्वमेंट संपवता येते आणि सुरूही करता येते. पण ही निवडही खरी का? एकदा निवड केल्यावर आपल्या मानगुटीला बसते ती. भारतात नोकरी मिळाली म्हणूनच आलो परत. पण मिळावी म्हणून कासाविशी झाली ती कशाने? नोकरी सोडून तर अश्विनीसाठी आलोच नसतो कधी.
केस विस्कटलेले, घामाने भिजलेला चेहरा, आणि तोही सुजलेला वाटतोय. खराब झालेला तरीही ट्रेंडी दिसणारा स्लिवलेस टॉप आणि जीन्स. व्यग्र डोळ्यांनी ती कसनुशी हसल्यावर व्याकूळ होऊन त्याने विचारलं, काय झालं ग तुला? ठीक आहेस ना?
हो रे. मला काय होणार...खूप भटकले आज इकडे तिकडे. थकलेय जरा. ते सोड. तू आलास...कालच रात्री ना?
हो. चल कोल्ड कॉफी घेऊ. बरं वाटेल तुला जरा.
कॅफे मध्ये बसून तिच्याकडे स्थिरपणे पाहत राहिला तो. ही आता अखेर समोरच. एवढं काही असाध्य नसतंच का म्हणजे? ही सुद्धा एक सामान्य बाईच मुंबईतली. कुणीतरी कुणालातरी असतंच. चांगली दिसतेय पण काळवंडलेली, सुकलेली. एवढं आसुसून का पाहावंसं वाटतंय तिच्याकडे? हिच्यात, किंवा खरं तर कुठल्याही बाईमध्ये एवढं सामर्थ्य कुठून येतं की आपल्या दोऱ्याच सरळ हातात घेते? असं काहीच नको असायला. साधीच तर आहे ही. कॉलेजियन रोमँटिकपणाचा मागमूसही नव्हता त्याच्यात. तरीही हे होत होतं. म्हणजे काय, तर आपणच शिरू पाहतोय ह्या सगळ्यात. ती कुठे काय करतेय...
तिचे थरथरते हात हातात घेतले त्याने. तिने नजर टाळली. आणि हात सोडवून घेतले.
कसा आहेस? कुठे उतरला आहेस?
अजय - मीरा कडे. मीरा देसाई.
आलं लक्षात. पण पुढे?
घर मिळेल लवकरच अशी आशा आहे.
कुठे बघतोयस?
पवईच्या आसपास. बघू अजून काही मिळालं नाहीये.
सो यू विल रिमेन अ कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह.
रोल असतात आपापले. पण बाहेरही पडता येतंच त्यातून. पडणार आहे कधीतरी.
तुझी अव्याहत कशी चालूये?
अव्याहत !
घराचं काय ठरवलंस ग?
कळत नाहीये रे. तुला तर माहीत आहे. मला अवघड आहे इथे राहणं. पुण्याला आईकडे जावं की काय असं वाटतं. पण अभयेची शाळा....मध्येच बदलणं ही अवघड. मी चौकशी करून आले.
नाही अश्विनी, पुण्याला कशी जाणार तू? मग नोकरीचं काय करणार?
अव्याहत आहे पुण्यातही. काम वेगळं आहे, फिरावंही लागेल. पण काय करणार...डोक्यावर छप्पर तर हवं.
अग असं नको करूस....होईल काहीतरी इथे.
होईल....पण आधी बाहेर पडायला हवं. जळत धुमसत इथे कसं राहायचं रे....एकेक दिवस जड जातोय.
तुला तो बाहेर तर नाही काढणार ना?
नाही. सभ्य माणूस आहे तो. मी बाहेर पडेपर्यंत पेशन्टली थांबेल.
बरं जाऊ दे ना हा विषय...तुला आमचं काम बघायला यायचंय ना? अश्विनी विषय बदलून छान हसली. कधी जाऊया सांग...
तू म्हणशील तेव्हा. मी सध्या तरी मोकळाच आहे.
अनेक कॉम्रेड्स आठवण काढतात तुझी.
खरंच?
हो अगदी. बाय द वे? तुझ्या जुन्या मित्रांबरोबर एक पार्टी करूया का?
नक्की करूया....पण कुठे? घर कुठाय अजून? हॉटेलात करण्यात मजा नाही. थांब जरा. घर होऊ देत.
पुण्याला जाणारेस?
जावं तर लागेलच कधीतरी. जेवढं पुढे ढकलता येईल तेवढं बरं. म्हणून हाहा असं तो मोठ्याने हसला.
त्यावर एकूणच करुणेने त्याला न्याहाळत आणि मग दूर पाहात ती म्हणाली, का व्हायला हवं होतं असं आपल्या दोघांच्याही बाबतीत?
तो वैतागून म्हणाला, हेय कमॉन ! आता रडणं वगैरे नको हां....मी मोकळा झालो आता. तुलाही सोडायचं आहे तुझं. न रडता सोड. मग हसला. इट्स एक्सायटिंग तू बी ऍट क्रॉसरोड्स. डोन्ट यु थिंक?
रडण्याला कमी लेखण्याएवढा लहान नाहीयेस सिद्धार्थ तू. ती अधोरेखून म्हणाली. हां, पुढे जायचं आहेच. ते कोण नाकारतंय?
इकडच्या तिकडच्या गप्पा होत होत्या. तो थोडा थोडा डिस्कनेक्ट होत गेला. अश्विनी भरभरून बोलत होती. विविध विषयांवर. साहित्य, सिनेमा....चॅटवर हे खूप चालायचं त्यांचं. पण आत्ता मात्र तिला बोलताना पाहायला आवडत होतं त्याला. हसताना चिकबोन्स किती सुंदर फाकतात तिची...आणि एक छान खळी. मग लार्जर फ्रेममध्ये ती दिसायला लागली त्याला. आय कॉन्टॅक्ट तोडून त्याचं लक्ष हळूहळू शिवाजी पार्क आणि पलीकडे गेलं. मला समुद्रावर फिरायचंय. येशील तू?
आत्ता? नकोरे. आता निघते.
हं. ठीक आहे. कशी जाणार आहेस? बसनेच ना? चल सोडतो तुला स्टॉपपर्यंत. एकूण त्याला उठायचंच होतं.
ती जरा खट्टू झाली. चिडलास का?
नाही, चल.
No comments:
Post a Comment