Thursday, April 14, 2022

कथा - भाग १

 

कथा - भाग

माझा जन्म पुण्याचा असला तरी मी वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत वाढलो जळगावात. इथेच माझे आजोबा वर्षानुवर्षे राहिले होते आणि पुढे आमचे घर झाले. सुरुवातीला चाळीत राहणारे आमचे कुटुंब माझ्या जन्माच्या वेळीच एका मोठा बंगला बांधून त्यात राहायला आले. माझे आजोबा जळगावात आयकर सल्लागाराचा व्यवसाय करत असत. ते फार शिकलेले नव्हते, पण त्या काळात फार न शिकताही हा व्यवसाय करणे शक्य होते. आमचे घर आधी जुन्या जळगावात बळीराम पेठेत होते. ते अर्थात मी पाहिलेले नाही, पण माझ्या आईच्या वर्णनावरून ते फारसे चांगले नसावे असे दिसते.

आमचे कुटुंब म्हणजे खानदेशी देशस्थ ब्राह्मणांचा अगदी मूर्तिमंत नमुनाच होते. खानदानी आळशीपणा, जुन्या परंपरा-रूढी ह्यांना चिकटून राहण्याची मनोवृत्ती, जातीचा मोठा गंड तसेच एका बाजूला हेकटपणा पण दुसऱ्या बाजूला उदार आणि दिलदार वृत्ती हे सारेच त्यात येते.

माझे आजोबा जरी मला आठवत असले तरी ते असेपर्यंत त्यांचे व्यक्तिमत्व नीट समजून घेण्याएवढा मी मोठा नव्हतो. त्यामुळे मला जे त्यांच्याबद्दल माहीत आहे ते इतरांनी सांगितलेल्या आठवणींमुळे. आजोबा कट्टर हिंदूमहासभावादी होते. एवढेच नव्हे तर जळगाव शहरात ते बहुधा हिंदूमहासभेचे प्रमुख होते. इथे मला माझ्या आजीने अत्यंत अभिमानाने अनेकदा सांगितलेला किस्सा आठवतो. एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर रेल्वेने कुठेसे प्रवास करत होते, आणि वाटेत सकाळी त्यांची ट्रेन जळगाव स्टेशनवर काही काळ थांबणार होती. त्यावेळी जळगावातील हिंदूमहासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हार-तुरे देऊन सत्कार करायचे ठरवले. माझे आजोबा आजीला घेऊन स्टेशनवर गेले. गाडी स्टेशनवर थांबल्यावर सावरकर बाहेर आले. ते नुकतेच उठले होते. बाहेर येऊन त्यांनी विचारले, कुठे आलोय आपण? एकाने त्यांना सांगितले, खानदेश आहे हा. सावरकर त्यावर म्हणाले, खानदेश नव्हे, हा तर “कान्ह देश” आहे ! कान्हाचा देश !

गांधीजींच्या हत्येनंतरचे भोग माझ्या आजी-आजोबांना भोगायला लागलेच. घरातले सामान बाहेर फेकणे, कपाटे, पुस्तके वगैरे जाळणे हे सर्व झाले. सुदैवाने कुणाला इजा वगैरे झाली नाही. परंतु त्यामुळे आजोबांच्या हिंदुत्वनिष्ठेत यत्किंचितही बदल झाला नाही. मला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे की आमच्या घराण्यात ही जाज्वल्य हिंदुत्वनिष्ठा कशी आली असेल. आमचे एक नातलग मराठवाड्यात सावरकरांचे सहकारी होते. वीर यशवंतराव जोशी म्हणून ते ओळखले जात. “भागानगरच्या नि:शस्त्र प्रतिकारा”त ते सहभागी होते. त्यांच्याबद्दल आमच्या घरात सर्वांना फार अभिमान असे. राजकीय कामामुळे त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यावर त्यांना असलेली एकुलती एक मुलगी शकू अक्का माझ्या आजोबांकडेच वाढली. तिला माझे वडील आणि काका सक्ख्या बहिणीप्रमाणेच वागवीत असत.

आजोबांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांशी फारसे पटत नसे. आजकाल आरेसेस-हिंदूमहासभा ही नावे जोडीनेच घेतली जातात. पण खरे तर त्यांच्यात साम्य कमी, भेदच जास्त. माझे वडील आणि दोन्ही काका मात्र कट्टर संघाचे. एक काका गेला, पण दुसऱ्या काकाची आणि वडिलांची संघनिष्ठा अद्याप अबाधित आहे.

जळगावला बारावीनंतर (तेव्हाची प्री-डिग्री) महाविद्यालयीन शिक्षण तेव्हा उपलब्ध नव्हते. म्हणून वडील शिक्षणासाठी पुण्याला राहिले. ते जवळजवळ ५ वर्षे. पदवी आणि नंतर कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण. त्या वेळी ते संघाकडे ओढले गेले. वडलांनी संघ शिक्षा वर्गाची तिन्ही वर्षे पूर्ण केली होती, आणि “तृतीय वर्षं शिक्षित” असा स्वत:चा उल्लेख करताना त्यांना अभिमान वाटत असे, अजूनही वाटतो.

तेव्हा वडलांच्या ओळखी संघातील खूप मान्यवर लोकांशी झाल्या. अगदी गोळवलकर गुरुजी, बाबाराव भिडे प्रभृती लोकांशी संबंध आले. अप्पा पेंडसे, ज्यांनी पुढे संघाचे काम सोडून ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही शाळा काढली ते वडलांचे चांगले मित्र होते. त्या सर्वांचा मोठा ग्रूपच होता. संघांच्या नित्य-नैमित्तिक कार्यक्रमांमध्ये ते सर्व सहभागी होत असत. १९६२ मध्ये पुण्यात आलेल्या पुरानंतर जी अपरिमित हानी झाली, तेव्हा संघाच्या पद्धतीप्रमाणे प्रेते उपसायला, लोकांना मदत करायला वगैरे जे संघाचे लोक धावून गेले त्यात वडील होतेच. अप्पांनी संघाचे काम सोडायचे ठरवल्यावर मात्र वडलांचे त्यांच्याशी मतभेद होऊन त्यांचा स्नेह संपुष्टात आला. गंमत अशी की पुढे मात्र ह्याच अप्पांनी सुरु केलेल्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत माझ्या वडलांनी मला घातले.

माझ्या वडलांचे वैशिष्ट्य असे की त्यांचा आवाज अतिशय चांगला होता. आजकाल वयोमानाप्रमाणे त्यांनी गाणे बंद केले आहे. परंतु अगदी संघातच नव्हे तर कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही त्यांचे एखादे गाणे व्हायचेच. शाखेत प्रार्थना सांगणे आणि पद्य म्हणणे ही कामे त्यांच्याकडे असत. त्यांची पद्ये महाराष्ट्रात खूप गाजली होती आणि बहुधा ते प्रांताचे पद्यप्रमुख म्हणूनही नेमले गेले होते. त्यांचे काफी रागात बसवलेले संपूर्ण वंदेमातरम् आठवत असलेले लोक अजूनही बरेच सापडतील.

पुढे वडील जळगाव शहराचे सरकार्यवाह झाले. संघचालक होते डॉक्टर अविनाश आचार्य. वडिलांचे शहरात संघाच्या वर्तुळात मोठे स्थान होते. वडिलांचे काही मित्र मला चांगले आठवतात. कुशाभाऊ पुंडे, रघुजी रारावीकर, मधुकर खाडीलकर हे अत्यंत जवळचे मित्र. इतरही बरेच होते. सर्वजण वडिलांना रामभाऊ म्हणत असत. अशा प्रकारे माझ्या वडलांचे संपूर्ण व्यक्तिमत्व संघाने भारलेले होते आणि आहे. पुढे पुढे त्यांचा प्रत्यक्ष कामातील सहभाग कमी कमी होत गेला, पण निष्ठेत फरक पडला नाही. हेच माझ्या दोन्ही काकांबद्दलही आहे. एक काका मुंबईत राहून शिकला, तिथेही त्याने संघाचे काम केले. दुसरा काका मात्र फारसा शिकला नाही. तो जळगावातच राहिला.

पूर्वी संघात असणे म्हणजे नियमित शाखेत जाणे असे सूत्रच होते. आजकाल हे राहिलेले नाही. संघाच्या नावाने मोठमोठाल्या गर्जना करणारे लोकही रोज शाखेत जाताना अपवादानेच आढळतील. मुळात आजकाल शाखा चालतात किती हाच प्रश्न आहे. पुण्यात जिथे निवृत्त लोक सकाळी गप्पा मारायला जमतात अशा काही शाखा दिसतात ! पण त्या काळात मात्र शाखा नियमित चालत असत आणि माझे वडील आणि काकाही नियमितपणे तिथे जात असत.

आमच्या एकत्र कुटुंबाचे एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे एकूण राजकारण ह्या विषयात असलेला अतोनात रस. हा सर्वांचाच स्थायी भाव होता. आजी-आजोबा, माझे वडील आणि दोन्ही काका, शिवाय दोन्ही आत्या ह्या सर्वांनाच राजकारणाचे भयंकर वेड. त्यामुळे रोज घरात कडाक्याचे वाद चालत असत. आमचा स्वतंत्र बंगला असला तरी हे वादविवाद शेजारच्या बंगल्यात ऐकू जात एवढे एकेकाचे आवाज जबरदस्त. सकाळी पेपर वाचता वाचता आणि चहा पिता पिता हे वाद सुरु होत ते तासंतास चालत. कुणाला कामावर जायचे नसे का, असा प्रश्न अर्थातच पडेल. त्या बाबतीत आमच्याकडे सरंजामी पद्धत होती. माझ्या आजोबांचा आयकर सल्लागाराचा व्यवसाय माझ्या वडलांनी पुढे चालू ठेवला. हा व्यवसाय म्हणजे सर्व कुटुंबाचा व्यवसाय समजला जात असे, जरी खरे तर तो तसा नसतो. मला आठवते तसे आजोबा निवृत्त झालेले होते. वडील व्यवसायात अतिशय व्यस्त असत. व्यवसायही जोरात होता.  माझा धाकटा काकाही नंतर त्याच व्यवसायात शिरला. त्यावरून पुढे भरपूर भाऊबंदकी झाली, आणि आम्ही जळगाव सोडून पुण्याला आलो. पण ते नंतर. त्यावेळी काकाला काम वगैरे करणे ह्यात फार रस नसे. वडील जरी सकाळच्या वादविवादात पडले तरी १० वाजता ते ऑफिसात निघून जात. उरलेल्या दोन्ही काकांचे महाभारत पुढे चालू राहत असे. त्यात आजी आजोबा, आत्या हेही असत. धाकटा काका सावकाश, आरामात बारा वाजेपर्यंत ऑफिसात पोचत असे. माझा दुसरा, म्हणजे मधला काका हे एक अजब रसायन होते. मोठा हुशार माणूस, पण त्याने कुठलीच गोष्ट आयुष्यात धड केली नाही. त्याचा चित्रकलेचा हात चांगला होता, गाण्याचा आवाजही बरा होता. त्याने वाटेल ते उद्योग केले. प्रिंटींग प्रेस, म्हशी पाळणे, स्क्रीन प्रिंटींग, अशा विविध क्षेत्रांमध्ये संचार केला, पण कशातच त्याचा जम बसला नाही. घरातल्या एकूण देशस्थी कारभारामुळे त्याला कुणी पैसे मिळवण्यासाठी फार दबावही आणला नाही. वडील सर्व पैसे आजीकडे देत असत. त्यातून सगळ्यांचाच खर्च चालत असे. एकत्र कुटुंबात एखाद्या न कमावणाऱ्या माणसाचे कसेही निभून जाते तेच त्याचे झाले, निदान काही वर्षे तरी.

हे सारे मी पुढे काही काळानंतर स्वत: अनुभवले, परंतु मी अगदी लहान असताना अर्थातच माझा ह्या गोष्टींशी काही संबंध नव्हता. ह्या आठवणी मुख्यत: माझ्या आईवडिलांनीच पुढे मला सांगितल्या आहेत. माझी आई लग्न होऊन ह्या कुटुंबात आल्यावर तिला हा सर्व गावठी प्रकार पाहून मोठा धक्का बसला. कारण असे तिने कधीच  पाहिले नव्हते. ती पुण्यातून आलेली. स्वत: नोकरी करणारी. पुण्याची नोकरदारांची प्रगत संस्कृती आणि जळगावची निम-ग्रामीण संस्कृती ह्याचा तिला मेळ बसेना. सकाळी चहापासून गप्पा सुरु होत त्याचे रुपांतर पुढे भांडणात होई. आधी स्वयंपाकघरातल्या टेबलवर सुरु असलेला वाद नंतर हिरीरीने दिवाणखान्यात जाऊन पुढे नेटाने रेटला जात असे. अशी भांडणे की विचारू नका. अनेकदा प्रचंड आवाज चढलेले असत. तिघेही भाऊ हमरीतुमरी वर येत. जारे, माहीत आहे अमुक तमुक कसा आहे तो ! एकेकाच्या तंगड्या तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशीच भाषा. तिला सुरुवातीला वाटे, भावांची वैयक्तिक भांडणे चालू आहेत. नीट ऐकल्यावर तिच्या लक्षात येई की अरेच्या, ह्या भांडणात इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, नानाजी देशमुख, बाळासाहेब देवरस ही मंडळी कुठून आली? ! तर असा प्रकार होता. संघमय असलेली कुटुंबे मी भरपूर पाहिली आहेत, पण एवढा आवेश फार कुणात पाहिलेला नाही. अर्थात जास्त जोर बोलण्यातच हेही तितकेच खरे !

माझे काका किती कट्टर संघवाले होते त्याचा एक गमतीदार किस्सा सांगतो. मी जळगावच्या शाळेत असताना आम्हाला शाळेत काही गाणी शिकवली होती. त्यात साने गुरुजींचे “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” हे मानवतावादी गाणे होते. मला ते आवडले होते आणि मी घरी येऊन ते गुणगुणत असे. एकदा माझ्या एका काकाने ते ऐकल्यावर तो माझ्या अंगावर खेकसला, ही समाजवाद्यांची भेंडीच्या भाजीसारखी पुळचट गाणी कसली म्हणतोस ! मी तुला एक जबरदस्त गाणे शिकवतो ते म्हणत जा. असे म्हणून त्याने मला “हिंदूतेजा जाग रे, जाग आता सावधान, घे प्रतिज्ञा जी करी भारताचे पुनरुत्थान, भाग्यशाली हिंदुस्थान” हे अत्यंत आवेशपूर्ण असे संघाचे “पद्य” शिकवले. मला तेही आवडले आणि ते माझे पाठ झाले. तेव्हा समाजवादी म्हणजे काय, अगदी साने गुरुजी कोण होते ह्याही गोष्टी मला ठाऊक नव्हत्या. पण मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा प्रभाव पडतो तसा तो माझ्यावर अर्थात पडत गेला. पण हे तेवढेच नाही. ही तर सुरुवात होती. अखेर मी हे सारे लिहीतो आहे तो माझा वैचारिक प्रवास सांगण्यासाठी. त्याची ही पार्श्वभूमी अशी तयार होत होती. “बालांच्या” शाखेत तर मी जात असेच. पुढे प्रार्थना सांगण्यासही शिकलो. त्या शाखेवर आसपासची बरीच मुले येत असत आणि खेळही चांगले होते. आमच्या घराजवळच “फैल” ह्या नावाने प्रसिद्ध असलेली झोपडपट्टी होती. (आज हे लिहीताना मला ब्राझीलमधल्या रियो दि जानेरो मध्ये पाह्लेले “फवेला” उगाचच आठवत आहे. नामसाधर्म्यामुळेच बहुधा !) तिथली मुलेही येत असत. शाखेवर फक्त ब्राह्मण येतात हे निदान त्यावेळी तरी शाखेत मी पाहिले नाही. जळगावात मुळात ब्राह्मण कमीच. लेवा-पाटील, मारवाडी, सिंधी आणि मग इतर अनेक जाती ह्यांचा भरणा खूप. माझ्या मित्रांची नावे मला आठवतात त्यावरून माझ्या मित्रांमध्ये दोघेतिघे सोडून कुणी ब्राह्मण नव्हतेच हे आज लक्षात येते. त्या वयात अर्थात जात ही गोष्ट माहीतच नसते.    

माझ्या आई-वडलांचे लग्न १९६६ साली झाले. माझा जन्म १९६८ चा. माझ्या आईने हे भयंकर एकत्र कुटुंब ४ वर्षे सहन केले. घरात काम करणारी दोनच माणसे – माझे वडील पैसे कमावणार, आणि आई घरातली कामे करणार. बाकी सगळे रिकामे. कुणाला काहीच करायचे नव्हते. सकाळपासून गप्पा मारायच्या, चहावर चहा चालूच. पुरुष मंडळी बाहेर गेल्यावर आजी, आजोबा, आत्या ह्यांच्या गप्पा. पुढे मोठ्या आत्याचे लग्न झाले. पण धाकटी आत्या होतीच. ती कॉलेजात जात असे. सर्वांचे काम एकटीवर पडल्यावर आईला त्याचा फार त्रास होऊ लागला. ती तशी खूप सौम्य स्वभावाची, सोशिक. ती कधीच भांडणांमध्ये पडत नसे. सगळ्यांचे ऐकून घेई, आणि नंतर रडत बसे. मग रात्री बाबांकडे तक्रार. हे अगदी सर्वत्र दिसणारे दृश्यच आमच्याकडे होते. हे सारे असह्य होऊन आई-बाबांनी १९७० साली वेगळे बिऱ्हाड करण्याचे ठरवले. त्यावरून प्रचंड भांडणे झालीच. पुण्याची मुलगी, ती घर मोडणारच हेही म्हणून झाले.

माझ्या आठवणी आहेत त्या अर्थातच इथून पुढच्या. आमच्या एकत्र घरापासून (सौरभ बंगला) जवळच एक धांडे नामक गृहस्थांचा बंगला होता. तिथे आम्ही २-३ वर्षे भाड्याने राहिलो. तिथे राहत असतानाच माझ्या धाकट्या भावाचा जन्म झाला. पुढे आमची परिस्थितीही काहीशी सुधारली म्हणून म्हणा, आणि ते घर फारसे चांगले नव्हते म्हणून म्हणा, पण तिथून काही अंतरावर असलेल्या बोरोले बिल्डींग मध्ये आम्ही एक फ्लॅट भाड्याने घेतला. तो फ्लॅट खरोखर चांगला होता. फर्निचर वगैरे केल्यावर अगदीच गरिबाचे घर न वाटता बऱ्यापैकी सधन माणसाचे घर नक्की वाटत होते एवढी आठवण मला आहे.

२५ जून १९७५. आम्ही इथेच राहत असताना इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली. त्याच्या आगेमागे चालू असलेले प्रचंड मोठे राजकारण कळण्याएवढा मी मोठा नव्हतो. जेमतेम ७ वर्षांचा होतो. पेपर वगैरे वाचन फार नव्हते. परंतु २६ जूनच्या रात्री आई वडिलांमध्ये झालेली चर्चा अंधुकशी आठवते. वडील काहीसे गंभीर झाले असावेत आणि ह्या घटनेमुळे काय होऊ शकेल हे आईला समजावून देत असावेत. मात्र त्यांनाही सर्व परिस्थितीची पूर्ण कल्पना होती असे वाटत नाही. संघावर बंदी जाहीर झाली होती. इथून पुढे काय करायचे, काय भूमिका घ्यायची, ह्याबद्दल सर्वांच्याच मनात संदेह असणार.

४ जुलै, १९७५. माझ्या वडिलांना मिसा ह्या कायद्याखाली अटक करण्यात आली. ह्याच दिवशी संघाच्या राष्ट्रीय नेतृत्वालाही अटक झाली. देशभर अटकेचे सत्र चालू झाले. माझे वडील संघाच्या संघटनेत एवढ्या महत्वाच्या स्थानावर नव्हते की त्यांना पहिल्या फेरीतच अटक व्हावी. त्यांचे काम जळगावापुरतेच मर्यादित होते. अगदी पुण्यात सुद्धा एवढ्या लवकर आणि एवढ्या प्रमाणात धरपकड झाली नाही. जळगावात त्यावेळी काहीतरी वेगळे घडले असले पाहिजे असे तेव्हापासून वाटत आले आहे.

मी शाळेतून आल्यावर मला आईने हे सांगितले. सांगताना ती रडतच होती. मीही रडायला लागलो. वडिलांना तूर्त जळगावातच एका कस्टडीमध्ये ठेवण्यात आले होते. आम्ही त्यांना तिथे भेटायला गेलो. तिथे वडील संघाच्या  अनेक मित्रांबरोबर निवांत गप्पा मारत बसले होते. ते पाहून आमचा जीव भांड्यात पडला.

वडिलांना लवकरच नगर जिल्ह्यातील विसापूरच्या तुरुंगात हलवण्यात आले. आम्ही तिथेही त्यांना भेटायला गेलो. आमच्या आजोळी म्हणजे खुर्जेकर कुटुंबात ह्या घटनेमुळे हलकल्लोळ उडाला. असे काही एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबात बहुधा घडत नसते. त्यांचा कुणाचाही राजकारणाशी फारसा संबंध नव्हता आणि त्यांना त्यात रसही नव्हता. माझे आजोबा (म्हणजे आईचे वडील), चुलत आजोबा, अनेक सख्खे व चुलत मामा हे सर्वच खूप घाबरून गेले. मात्र हे सांगणे भाग आहे की जळगावात आमच्या एकत्र कुटुंबात मात्र फार मोठा आघात झाल्याचे चित्र नव्हते. सर्व जण शांत होते. माझी आई तेवढी सैरभैर होऊन गेली होती. काय करावे ते तिला सुचत नव्हते. पहिल्या प्रथम आम्ही भाड्याचे घर सोडून पुन्हा सौरभ बंगल्यात राहायला गेलो. वडिलांना पकडले तरी धाकटा काका अद्याप बाहेर होता. तो होता तोवर व्यवसाय चालू राहणार होता. तेव्हा तेवढी भीती कुणाला वाटली नसावी. आमचे कुटुंब ह्या संकटाच्या प्रसंगी एक झाले. काकाने कधी नव्हे ते नीट काम करून थोडेफार पैसे मिळवायला सुरुवात केली. मात्र ४-५ महिन्यांनी त्यालाही अटक झाली. मध्यंतरी वडिलांना विसापूरमधून पुण्यात येरवडा कारागृहात हलवण्यात आले. माझ्या धाकट्या काकाची रवानगी नाशिकच्या तुरुंगात झाली. मधल्या काकाला तसाही कुटुंबाचा भार झेपणार नव्हता. त्याची कमाई काही नव्हतीच. (म्हणूनच की काय) त्याने जनसंघाच्या एका तुकडीत सामील होऊन सत्याग्रह केला. इतरांबरोबर त्याच्यावरही खटला भरला गेला आणि त्याला शिक्षा होऊन नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात आले. माझे वडील आणि धाकटा काका ह्यांच्यावर मात्र खटले झाले नाहीत. त्यांना मिसा खाली स्थानबद्ध करण्यात आले होते.

ह्यानंतरचा काळ आमच्या कुटुंबासाठी अतिशय बिकट होता. व्यवसाय बंद पडला. घरात आजी, आजोबा, आई, मी आणि माझा धाकटा भाऊ प्रसाद. आईची आयुष्यातील सर्वोच्च कसोटी ह्या वेळी लागली. आणि ही जबाबदारी तिने अत्यंत समर्थपणे पार पाडली. माणसाचे कर्तृत्व संकटाच्या प्रसंगी खरे कळून येते, हेच तिने सिद्ध केले. स्वत: कमावत नसताना वडिलांकडून मिळालेले पैसे, जे तिने वेळोवेळी साठवून त्याच्या ठेवी केल्या होत्या तेवढ्यावर तिने हा सगळा आणीबाणीचा काळ खेचून नेला, आणि एक रुपयाचेही कर्ज आम्हाला झाले नाही हे तिचे कर्तृत्व साधे नाही. ह्या ठेवी होत्या ह्याचे श्रेयही तिलाच आहे. माझ्या वडिलांचे लग्न होईपर्यंत बँकेत साधे बचत खातेही नव्हते. आईने त्यांना ते करायला लावले. पैसे बाजूला टाकायला लावले. नाहीतर आधी आमच्या कुटुंबात पैसे कमवायचे आणि खर्च करायचे हाच खाक्या होता.

ह्याच दिवसांमध्ये माझे टॉन्सिल्सचे ऑपरेशन, आजीला झालेली नागीण, आत्याचे बाळंतपण अशा आणि इतर अनेक संकटांना आईने धैर्याने तोंड दिले. आम्ही हे दिवस गरिबीतच काढले असे आज लक्षात येते. पण त्यावेळी तिने आम्हाला काहीही जाणवू देखील दिले नाही. आईने सर्व आघाड्यांवर एका वेळी लढून प्रयत्नांची शर्थ केली. स्वत:ला कसे समजावले ते तिचे तिलाच माहीत. वडिलांच्या ह्या तुरुंगवासाचे एक वैशिष्ट्य असे होते की ते केव्हा सुटणार ह्याची कल्पना नव्हती. किती काळ आणीबाणी चालेल हे कुणीच सांगू शकत नव्हते. कुणी कुणी घाबरवत असत की दहा वर्षे तरी आणीबाणी उठणार नाही. पहिल्यांदा हे ऐकल्यावर त्या दिवशी आई खचल्याचे आणि खूप रडल्याचे मला आठवते. सासू-सासऱ्यांनी तिला शक्य तेवढा धीर दिला. मात्र तिने हळूहळू नोकरी करण्याचा विचार सुरु केला होता, आणि मला खात्री आहे की हेही आव्हान तिने निश्चितपणे पेलले असते.

आणीबाणीच्या काळात संघाच्या लोकांनी जी साथ आमच्या कुटुंबाला दिली ती अतिशय कौतुकास्पद म्हणावी लागेल. अनेक संघाचे प्रचारक भूमिगत झाले होते. त्यातले एक दोघे येऊन आमच्या घरी राहिले. त्यातल्या एकाची ओळख हे आमचे कोकणातले नातेवाईक साठे अशी आई इतरांना करून देत असे. त्यांचे खरे नाव वेगळे होते. ह्या गृहस्थांनी आम्हाला खूप मदत केली. अर्थात त्यांनाही आमच्या घरी राहायला मिळाले हाही भाग होताच. आजीला नागीण झाल्यावर आम्हा मुलांना आणि विशेषत: माझ्या धाकट्या भावाला सांभाळण्याचे, मला शाळेत सोडण्याचे वगैरे काम साठे हौसेने करीत असत. आमचा जो भाड्याचा फ्लॅट होता तो सोडू नये असे आम्हाला संघाच्या लोकांकडून सांगण्यात आले होते. त्याचे भाडे भरणे आईला जड जात होते. तरी बराच काळ तो फ्लॅट ठेवला होता. पुढे काही महिने संघातील कुणीतरी त्याचे भाडे भरले असे कळले. तिथे संघातील भूमिगत प्रचारक येऊन राहत असत. आईला ह्याची कल्पना असे. तिथे नानाजी देशमुख येऊन राहिल्याचे मला नंतर कळले. आईने ही खरोखर मोठी जोखीम घेतली होती असे आता वाटते.

ह्या दोन वर्षांत माझ्या शाळेची मात्र परवड झाली. ह्याचे कारण आमच्या वारंवार होणाऱ्या पुण्याच्या फेऱ्या. दोन महिन्यांतून एकदा तरी आम्ही पुण्याला येत असू. आल्यावर निदान ७-८ दिवस राहायचे. रोज वडिलांना भेटायला बसने येरवड्याला जायचे. तिथे तासभर वेळ मिळत असे. हा सगळा अनुभव विलक्षण होता. वडिलांना कुटुंबाची चिंता होतीच पण अनेक जिवलग मित्र सोबत असल्याने ते चांगल्या मनस्थितीत असत, हास्यविनोदही करत. तिथे संघाचे अनेक मोठमोठे नेते आम्हाला भेटले. खुद्द बाळासाहेब देवरस तिथे होते. अन्यही बरेच. तिथे मला प्रथम जनसंघ, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, आनंदमार्ग हे शब्द कानावर पडले. एका आनंदमार्गी संन्यासी माणसाची भेट झाली. भगवे कपडे आणि दाढी असा त्याचा वेष होता. सह्बंदी असल्याने वडिलांची ओळख होती. आम्हाला पाहून ते हसले. त्यांनी त्यांच्या झोळीतून दोन आंबे काढून मला व प्रसादला दिले. नंतर वडिलांकडून कळले की ह्या व्यक्तीवर खुनाचा आरोप होता. ते कळल्यावर मी अक्षरश: शहारलो होतो.

ह्या काळातला एक प्रसंग सांगणे आवश्यक आहे. आमच्या आजोळी म्हणजे खुर्जेकर कुटुंबाला माझ्या वडिलांचा तुरुंगवास असह्य झाला होता. त्यांना आईचे हाल बघवत नव्हते. माझे चुलत आजोबा तेव्हा अहमदनगर जिल्ह्यात मोठे वकील होते. ते सहकारी क्षेत्रात काम करत असत. त्यामुळे अर्थात त्यांचे कॉंग्रेस पक्षातील वजनदार व्यक्तींशी चांगले संबंध होते. असाच कुठलासा संबंध वापरून त्यांनी वडिलांना सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अशी अट घालण्यात आली की वडिलांनी माफीपत्र लिहून द्यावे आणि संघाचे काम सोडेन असे वचन द्यावे. आणीबाणीच्या काळात अनेकांनी अशी माफीपत्रे देऊन सुटका करून घेतली होती हे संबंधितांना माहीत असेल. हा प्रस्ताव घेऊन माझे मामा आणि आई येरवड्याला गेले आणि त्यांनी वडिलांना हे सांगितले. वडिलांनी माफीपत्र देण्यास साफ नकार दिला. मामांनी त्यांच्याशी खूप वाद घातला पण ते बधले नाहीत. माझे एवढे सहकारी तुरुंगात पिचत पडले असताना माफी देऊन मी सुटावे हा विचारही मी करू शकत नाही असे वडिलांनी त्यांना सांगितले. हा प्रसंग १९७६ मधला आहे. ह्यावेळी आणीबाणी कधी उठणार ह्याची थोडीसुद्धा कल्पना कुणालाही नव्हती हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

वडील ऐकत नाहीत तेव्हा त्यांच्या वडलांशी बोलून पाहावे, त्यांनी सांगितल्यास कदाचित ऐकतील असे माझ्या पुण्याच्या आजोबांना वाटले. म्हणून ते जळगावला माझ्या आजोबांना भेटायला आले. त्यांचे जे बोलणे झाले ते मी ऐकले नाही. पण मला जे कळले ते असे की माझे जळगावचे आजोबा त्यांना म्हणाले की मला माझ्या तिन्ही मुलांचा अभिमान वाटतो. ज्याप्रमाणे तिन्ही सावरकर बंधू देशासाठी तुरुंगात गेले, तशीच माझी मुले गेली आहेत. त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. राजकारणामुळे त्यांना तुरुंगवास घडला आहे. असे असताना त्यांनी माफी का मागावी? मी काही त्यांना माफी मागायला सांगणार नाही. माझे पुण्याचे आजोबा हताश होऊन परत गेले. जाताना आईला म्हणाले, सावरकरांशी आपण तुलना करावी का? ते कुठे, आपण कुठे. हा जो व्यक्तीमत्वातला पीळ आहे तो आई आणि वडील ह्या दोघांकडूनही माझ्या वडिलांना मिळाला असे दिसते. माझ्यात मात्र हा गुण आला नाही. अर्थात ते पुढे येईलच.

परंतु कणखर व्यक्तिमत्व तयार होवो न होवो, परंतु हे सर्व होत असताना माझ्यावर त्याचे संस्कार झाल्याशिवाय कसे राहतील? सतत आसपास भेटणारे संघाचे लोक, त्यांच्या आपुलकीच्या वागण्याने संघ हे जणू एक मोठे कुटुंब आहे आणि आपण त्याचा भाग आहोत ही भावना तेव्हा मनात रुजत गेली ही नक्की. ह्या आपलेपणाला त्या वेळी अर्थात वैचारिक संदर्भ नव्हता. तो बराच नंतर आला. त्यावेळची भावना ही आपण ह्या प्रसंगात सामील असण्यामुळे होती. कोरडी तत्वनिष्ठा आमची कुणाचीच नव्हती. आम्ही प्रत्यक्ष होरपळून निघालो होतो. ह्याचाच परिणाम म्हणून निर्दोष असलेल्या माझ्या वडिलांना विनाकारण तुरुंगात टाकणाऱ्या इंदिरा गांधी आणि संजय गांधी ह्यांच्याबद्दल असलेला तीव्र संताप आणि तिरस्कार. आणि तो अर्थात संपूर्ण कॉंग्रेस पक्षाबद्दलच वाटू लागला. त्या वेळी कॉंग्रेस ही एवढी वाईट गोष्ट वाटत असे की कुठलाही चांगला माणूस त्यात कसा जाऊ शकतो असाही प्रश्न मला पडल्याचे स्मरते !

१८ जानेवारी १९७७. ह्या दिवशी अचानक इंदिरा गांधींनी निवडणुका जाहीर केल्या. तिथपासून देशात उत्साहाला उधाण आले. हे मी स्वत: जळगावात आणि पुण्यात नीट पाहिले आहे. पुण्यात मोहन धारिया ह्यांच्या प्रचारासाठी झालेल्या जयप्रकाश नारायण ह्यांच्या सभेला मी होतो. तसेच ना.ग. गोरे, पु.ल. देशपांडे आणि अन्य बरेच नेते ह्यांचीही एक सभा ऐकली. जळगावात आमच्या घराबद्दल प्रचंड आदर होता. अनेक अनोळखी लोक आम्हाला भेटून धीर देत असत. ह्या निवडणुकांची तयारी चालू झाल्यावर आमचे घर हा जणू राजकारणाचा अड्डा बनून गेला. जनता पक्ष हा आम्हाला आमचा पक्ष वाटायला लागला. माझ्या आईनेही प्रचारात भाग घेतला. मी स्वत: देखील “जाऊन सांगा घरोघरी, नांगरधारी शेतकरी”, “अंधेरेमे एक प्रकाश, जयप्रकाश, जयप्रकाश” ह्या घोषणा देणाऱ्या मिरवणुकांमध्ये अनेकदा गेलो. आमच्या रस्त्यावर पोस्टर्स चिकटवण्यात भाग घेतला.

ह्या सर्व दिवसांमध्ये राजकारणाला प्रचंड वेग आला होता. आमच्या घरी आजी-आजोबा-आई ह्यांच्याही जोरात चर्चा चालू असत. जनता पक्ष निवडणूक जिंकला तर आणीबाणी उठणार आणि माझे वडील सुटणार हाच अर्थात चर्चांचा मुख्य विषय असे. जनसंघाचे काही नेते सुटले होते, आणि प्रचारात सहभागी झाले होते.

२१ मार्च १९७७. रात्री जीवाचा कान करून आम्ही रेडियो ऐकत बसलो होतो. ती रात्र आम्ही सर्वजण जागलो. इतर अनेक चांगले निकाल येत होते. प्रत्येक बातमीने उत्साह वाढत गेला. संजय गांधी पराभूत झाल्याचे कळल्यावर अत्यानंद झाला. अखेर पहाटे चार वाजता बातमी ऐकली, की “रायबरेली निर्वाचन क्षेत्रसे प्रधानमंत्री इंदिरा गांधी अपने निकटतम प्रतिद्वंद्वी जनता पार्टी के राजनारायण से पचपन हजार वोटोंसे पराभूत हो गयी है”. त्या क्षणी आमच्या घरी आणि गावात झालेला जल्लोष आजही मी विसरू शकत नाही. फटाके वाजवणे चालू झाले होते. पहाटेच उत्साही तरुणांनी मिरवणुका काढायलाही सुरुवात केली.

दोन वर्षांचा ताण त्या क्षणी गळून पडला. अख्ख्या देशाला वेठीला धरणाऱ्या मस्तवाल बाईचा, तिच्या नतद्रष्ट मुलाचा आणि पक्षाचाच पराभव जनतेने केला होता, तोही लोकशाही मार्गाने. बाईंचा पराभव हा व्यक्तिगतरीत्या आम्हाला सर्वांना आमचा बिजय वाटत होता. त्यांच्याविरुद्ध जिंकलेल्या राजनारायण ह्यांच्याबद्दल कुणालाच सोयरसुतक नव्हते ! तर एवढे आम्ही सर्व त्या राजकारणात मनाने सामील झालो होतो.

२२ मार्च ची सकाळ नेहमीपेक्षा वेगळी होती. सर्वत्र उत्साहाचे वातावरण. गुलाल, पताका असे शहरभर. त्यातच आणीबाणी उठल्याची बातमी कानावर पडली, आणि नंतर निरोपही आला, की वडिलांची सुटका झाली आहे, आणि ते ट्रेनने जळगावला येत आहेत. त्यांच्याबरोबर डॉक्टर आचार्यही होते.

मी त्या वर्षी चौथ्या इयत्तेत होतो, आणि ज्या दिवशी म्हणजे २३ मार्चला वडील जळगावला पोचले त्या दिवशी माझी वार्षिक परीक्षा होती. ही तर माझ्यासाठी मोठीच समस्या होती. संघ आणि जनता पक्ष ह्यांनी डॉक्टर आचार्य आणि माझे वडील ह्या दोघांना ट्रकच्या टपावर बसवून, मोठमोठे हार घालून आणि गुलालाने माखून त्यांची प्रचंड मिरवणूक काढली. सगळे गाव आज ह्या मिरवणुकीत सामील होते. अशा वेळी मी काय करायचे? माझी आई ह्या बाबतीत अतिशय कडक होती, आणि मी वार्षिक परीक्षा बुडवून मिरवणुकीत सामील व्हावे हे तिला मान्य नव्हते. परंतु अखेर तिचा नाईलाज झाला. आमच्या शाळेतील बरेच शिक्षकच मिरवणुकीत होते. काही शिक्षक स्वत:च तुरुंगात होते आणि तेही सुटून आले होते. त्या धबडग्यात कुणीतरी माझ्या परीक्षेची जबाबदारी घेतली, आणि मी आनंदाने ट्रकवर जाऊन बसलो ! माझी आणि अशा अन्य काही मुलांमुलींची परीक्षा दुसऱ्या दिवशी घेण्यात आली. माझे दोन्ही काका अजून १-२ दिवसांनी सुटून आले.

घरी आल्यावर दमलेले वडील घरातल्या मधल्या खोलीत येऊन पलंगावर बसले, आणि त्यांनी आईकडे जसे पाहिले ते आजही माझ्या स्मरणात आहे.

 

वडिलांनी पुनश्च हरी ओम म्हणून पुन्हा व्यवसायाला प्रारंभ केला. घरची परिस्थिती तेव्हा खरोखर बिकट झाली होती. व्यवसाय पुन्हा सुरु करणेही सोपे नव्हते. माझ्या वडिलांनीच बऱ्याचशा केसेस एका आयकर सल्लागारांकडे सोपवल्या होत्या. सुटल्यावर परत देण्याच्या बोलीवर. अर्थात सदर गृहस्थांनी त्यांचे वचन पाळले नाही हे सांगायला नकोच. ते एक वर्षं आम्ही कसे तरी जळगावात घालवले. शिवाय आल्यावर वडील आणि काका ह्यांची व्यवसायावरून खरोखरीची भांडणे सुरु झाली. वडिलांच्या हे लक्षात येऊ लागले की एवढ्या छोट्या गावात परत पहिल्यासारखा जम बसवणे फार अवघड आहे. आता पहिल्यापेक्षा अधिक स्पर्धाही आहे, आणि पुन्हा ज्या केसेस मिळणार त्यात काकाचा वाटा असणार. आता सासुरवाडीचे लोक कामाला आले. सल्लामसलतीसाठी आमच्या पुण्याला फेऱ्या होऊ लागल्या. माझ्या चुलत आजोबांनी वडिलांना सांगितले, जळगाव सोडून द्या आणि पुण्याला या. पुणे मोठे शहर आहे. इथे संधीही बऱ्याच आहेत. माझा स्वत:चा वकिलीचा मोठा व्यवसाय आहे. माझ्या ऑफिसातच टेबल टाकून बसा. मी तुम्हाला केसेसही मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. पुण्यात व्यवसाय करा.

आणि आई-वडिलांनी पुण्याला येण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. १९७८ च्या जून महिन्यात आम्ही पुण्याला आलो.

 

  

 

 

 

 

No comments:

Post a Comment